महिलेच्या नावावर घर घेतल्याचे फायदे
महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास सर्वात मोठा फायदा म्हणजे स्टॅम्प ड्युटीमध्ये मिळणारी सूट. मालमत्ता खरेदी करताना नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मात्र अनेक राज्यांमध्ये महिलांसाठी या शुल्कात सवलत देण्यात येते.
याशिवाय गृहकर्ज घेताना महिलांसाठी व्याजदरात थोडी कपात केली जाते. त्यामुळे घर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचा एकूण खर्च कमी होतो. तसेच काही सरकारी घरकुल योजनांमध्ये महिलांच्या नावावर मालमत्ता असणे हा लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाचा निकष मानला जातो.
advertisement
स्टॅम्प ड्युटीमध्ये कशी मिळते सूट?
मालमत्ता नोंदणी करताना सरकारकडून स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. ही रक्कम मालमत्तेच्या किंमतीनुसार ठरते आणि ती अनेकदा मोठ्या प्रमाणात असते. मात्र महिलांच्या नावावर मालमत्ता नोंदवली तर या शुल्कात सूट मिळते.
उदाहरणार्थ, काही राज्यांमध्ये महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीचे दर पुरुषांच्या तुलनेत कमी ठेवण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये महिला खरेदीदारांसाठी स्टॅम्प ड्युटी सुमारे ४ टक्के आहे, तर पुरुषांसाठी ती सुमारे ६ टक्के आहे. म्हणजेच महिलांच्या नावावर मालमत्ता घेतल्यास थेट दोन टक्केपर्यंत बचत होऊ शकते.
गिफ्ट डीड किंवा इतर प्रकारच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या व्यवहारांमध्येही काही ठिकाणी महिलांसाठी वेगळ्या सवलती दिल्या जातात. त्यामुळे अनेक कुटुंबे मालमत्ता महिलांच्या नावावर नोंदवण्याचा पर्याय निवडतात.
महाराष्ट्रातही मिळते सवलत
रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीत सुमारे १ टक्क्याची सूट दिली जाते. ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी समुज्ज्वल घोष यांनी सांगितले की, ही सूट पहिल्या नजरेत कमी वाटू शकते, मात्र मालमत्तेची किंमत जास्त असल्यास ही बचत लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकते.
