कुणाला किती जागा मिळाल्या?
८४ जागांच्या मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टी सर्वाधिक ३५ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. एमआयएमने २१ जागा मिळवल्या, तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला. समाजवादी पक्षाला ५, काँग्रेसला ३ आणि भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. हा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.
पूर्व भागात भाजपचा दारुण पराभव
advertisement
शहराच्या पूर्व भागात शिवसेनेने १८ जागा जिंकत भाजपचा पूर्ण पराभव केला. भाजपला या भागात केवळ दोन जागा मिळाल्या. इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार आसिफ शेख आणि समाजवादी पक्षाचे नेते मुस्तकीन डिग्निटी यांनी आपले बालेकिल्ले कायम राखले. पश्चिम भागात मात्र शिक्षणमंत्री दादा भुसे आणि युवा नेते अविष्कार भुसे यांचा प्रभाव कायम राहिला. येथे शिवसेना-भाजपमध्ये थेट लढत झाली, मात्र निकाल शिवसेनेच्या बाजूने झुकले.
भाजपच्या पराभवाची प्रमुख कारणे
भाजपच्या पक्षांतर्गत गटबाजी आणि स्थानिक पातळीवरील मतभेदांमुळे संघटनात्मक ताकद कमी झाली. तसेच वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष आणि स्थानिक प्रश्नांकडे पुरेसे लक्ष न दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. पारंपरिक व जुन्या चेहऱ्यांवर अवलंबून राहणे भाजपला महागात पडले.
पूर्व भागात बनावट जन्मदाखले, रोहिंग्या-बांगलादेशी आणि मुस्लिम असल्याचे आरोप, तसेच एसआयटी कारवाईमुळे मुस्लिम समाजात नाराजी निर्माण झाली. या कारवाईत अन्याय झाल्याची भावना मतदारांमध्ये होती. हीच भावना ओळखून आसिफ शेख आणि मुस्तकीन डिग्निटी यांनी मायनॉरिटी डिफेन्स कमिटी च्या माध्यमातून न्यायालयीन व प्रशासकीय लढा उभारला, ज्याचा थेट फायदा त्यांना झाला.
शिवसेना कशी यशस्वी ठरली?
दुसरीकडे शिवसेनेने नवोदित आणि तरुण उमेदवारांना संधी दिली. आणि त्याचा मोठा फायदा झाला. मंत्री दादा भुसे यांचा मालेगाव हा बालेकिल्ला आहे. त्यांनी देखील आपल्या राजकीय दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.
