या प्रकरणी प्रतिमा गोकुळदास घाडगे (वय 33, रा. पोलीस वसाहत, मिल कॉर्नर) यांनी तक्रार दिली असून त्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांची नेमणूक सातारा पोलीस ठाण्यात आहे. त्यांचे पती अशोक विठ्ठल गोरे (वय 40) हे खासगी नोकरी करतात. तक्रारीनुसार, लग्नानंतर सुरुवातीची तीन वर्षे संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर पतीला दारूचे व्यसन लागले. यामुळे ते पत्नीवर संशय घेत वारंवार मानसिक त्रास देत होते.
advertisement
शनिवारी (10 जानेवारी) दुपारी 2 वाजता प्रतिमा घाडगे या मोंढा नाका येथे मार्ग बंदोबस्तावर कर्तव्यावर होत्या. त्याचवेळी त्यांचे पती घरी एकटे होते. दरम्यान, पोलीस अंमलदार दिनेश मुरमे यांचा प्रतिमा घाडगे यांना फोन आला. त्यांनी घराला आग लावल्याची माहिती दिली. ही बातमी समजताच त्या तातडीने पोलीस वसाहतीतील घरी धाव घेतली. तोपर्यंत अग्निशमन दलाच्या वाहनाने आग विझवलेली होती.घटनेनंतरही पती अशोक गोरे हे घटनास्थळी उपस्थित होते.
त्यांनी “आग विझवली असली तरी पुन्हा आग लावेन,” अशी धमकी देत प्रतिमा यांना शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घराची पाहणी केली असता सोफासेट, टीव्ही, खिडकीचे पडदे, टेबल यासह घरातील साहित्य जळून अंदाजे 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. या घटनेप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात प्रतिमा घाडगे यांच्या तक्रारीवरून पती अशोक गोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कय्युम अब्दुल मोहम्मद करत आहेत.
