वाढते भाडे आणि उपनगरांकडे वळण
मुंबईतील दक्षिण मुंबई, वांद्रे, अंधेरी, घाटकोपर यांसारख्या भागांमध्ये भाड्याचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी, अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे आणि नोकरी करणारे लोक उपनगरांचा पर्याय निवडत आहेत. थोडेसे अंतर वाढले तरी परवडणारे भाडे, चांगल्या सुविधा आणि कनेक्टिव्हिटी मिळत असल्याने उपनगरीय भाग अधिक आकर्षक ठरत आहेत.
मॅजिकब्रिक्सचा अभ्यास काय सांगतो?
advertisement
रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीचे व्यासपीठ असलेल्या Magicbricks च्या अभ्यासानुसार, मुंबई महानगर परिसरात काही असे भाग आहेत जिथे १५,००० ते ४०,००० रुपयांच्या बजेटमध्ये चांगल्या सोयी-सुविधांसह घरे उपलब्ध आहेत. या भागांची निवड प्रामुख्याने रेल्वे, मेट्रो, महामार्ग यांसारख्या कनेक्टिव्हिटी, विकसित होत असलेले इन्फ्रास्ट्रक्चर आणि तुलनेने कमी भाडे या निकषांवर करण्यात आली आहे.
मीरा रोड
मीरा रोड हा पश्चिम उपनगरातील वेगाने विकसित होणारा भाग मानला जातो. वेस्टर्न रेल्वे मार्गावर असल्यामुळे चर्चगेटपर्यंत थेट लोकल ट्रेन सेवा उपलब्ध आहे. तसेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांमुळे प्रवास अधिक सुलभ होत आहे. येथे २ BHK फ्लॅटसाठी सरासरी भाडे ३०,००० ते ३५,००० रुपयांच्या दरम्यान असून, डिपॉझिट साधारणपणे एक लाख रुपयांपर्यंत असतो. शाळा, कॉलेज, रुग्णालये आणि बाजारपेठ जवळ असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मीरा रोड हा संतुलित पर्याय मानला जातो. मात्र, मुख्य मुंबईपासूनचे अंतर हा एकमेव तोटा मानला जातो.
पनवेल
पनवेल हा नवी मुंबई परिसरातील सर्वात परवडणारा आणि वेगाने विकसित होणारा भाग म्हणून ओळखला जातो. येथे १ BHK फ्लॅटसाठी १२,००० ते १५,००० रुपये, तर २ BHK साठी २०,००० ते २५,००० रुपयांपर्यंत भाडे मिळू शकते. पनवेल हे सेंट्रल आणि हार्बर रेल्वे लाईनवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. तसेच मुंबई–पुणे एक्सप्रेसवे, एसटी बस सेवा आणि आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागाचे महत्त्व आणखी वाढत आहे. सध्या अंतर हा मुद्दा असला तरी भविष्यातील विकास पाहता पनवेलमध्ये राहणे दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.
