पुणे : पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. या कारवाईनंतर पाकिस्तानने देखील काही भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने तो प्रयत्न हाणून पाडला आहे. या पार्श्वभूमीवर युद्ध सुरु झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पण खरंच युद्ध सुरु झालंय का? यावर माजी लष्करी अधिकारी कर्नल अवधूत ढमढेरे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
खरंच युद्ध सुरू झालं का?
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. परंतु, कर्नल ढमढेरे यांच्या मते, “लष्करी दृष्टीकोनातून पाहता सध्या सुरु असलेली कारवाई ही पूर्णत: युद्ध मानली जात नाही. ही केवळ दोन-तीन दिवसांची संघर्षाची स्थिती आहे. भारताने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं असून, तो एक ‘प्रतिहल्ला’ होता.”
Ind vs Pak: सायरन वाजलं, सैनिक आले अन् अचानक गोळीबाराचा आवाज, पुण्यात असं का घडलं? Video
“ भारताकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा असून, रशियाकडून घेतलेली S-400 एअर डिफेन्स प्रणाली 2021 पासून भारताकडे येऊ लागली आहे. ही प्रणाली अत्याधुनिक असून, भारताची संरक्षण क्षमता अधिक बळकट झालेली आहे. त्यामुळे भारत अधिक सक्षम आहे,” असंही कर्नल ढमढेरे सांगतात.
काश्मीर हेच कारण..
1947, 1965, 1971 आणि कारगिल युद्ध अशा भारत-पाकिस्तान युद्धांच्या मागे नेहमीच काश्मीरमध्ये अतिक्रमण करण्याचा पाकिस्तानचा हेतू होता. 1965 मध्ये पाकिस्तानने 7000 प्रशिक्षित घुसखोर काश्मीरमध्ये पाठवले होते, हे त्याच उद्देशाचं उदाहरण आहे. काश्मीर प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सातत्याने संघर्ष होतात, असं निवृत्त कर्नल सांगतात.
अफवांवर विश्वास ठेवू नका
सध्याच्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना कर्नल ढमढेरे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असा सल्ला दिला. “जोपर्यंत सरकारी अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत अफवांपासून सावध राहणं आवश्यक आहे. अनावश्यक भीती आणि मनोधैर्य खचल्यामुळे लष्करावरही परिणाम होऊ शकतो,” असं ते सांगतात.
संभाव्य युद्धाचे परिणाम
कुठलंही युद्ध देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करतं. जर तणाव वाढत राहिला, तर भविष्यात युद्धाची शक्यता नाकारता येणार नाही. सध्या भारत-पाकिस्तान दरम्यान जे काही सुरु आहे ते युद्ध नाही, तर नियंत्रित संघर्ष आहे. अफवांना बळी न पडता अधिकृत माहितीची वाट पाहणं आणि लष्करावर विश्वास ठेवणं हेच सध्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, असंही निवृत्त कर्नल ढमढेरे यांनी सांगितलं.





