माझं स्वत:चं मत कुठे गेलं?
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुनंदा फेगडे यांना 0 (शून्य) मते मिळाल्याचं अधिकृत निकालात नमूद करण्यात आलं. हा निकाल पाहून केवळ उमेदवारच नव्हे, तर अनेक नागरिकही आश्चर्यचकित झाले. फेगडे यांचा थेट सवाल आहे. “मी स्वतः मतदान केलं होतं, मग माझं मत कुठे गेलं?” हा प्रश्न केवळ एका उमेदवारापुरता मर्यादित नसून, संपूर्ण मतदान प्रक्रियेवरच संशय निर्माण करणारा ठरतो आहे.
advertisement
‘मत मी दिलं, निकाल कुणी ठरवला?’
सुनंदा फेगडे यांनी व्यक्त केलेली नाराजी अधिक तीव्र आहे. “माझ्या कुटुंबीयांनी मला मत दिलं की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. पण मी स्वतः माझ्या नावासमोरचं बटन दाबलं होतं. मग ते मत कुठे गेलं?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मतदार बटन दाबतो, निकाल मशीन जाहीर करतं आणि त्यावर प्रश्न उपस्थित केला की स्पष्टीकरण राजकीय पक्षाकडून येतं, ही लोकशाहीची कोणती पद्धत आहे, असा संतप्त प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
विरोधकांचे आरोप, सत्ताधाऱ्यांची शांतता
ईव्हीएमच्या मुद्द्यावरून देशभरात यापूर्वीही अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. बामसेफ बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी सातत्याने ईव्हीएममध्ये गडबड होत असल्याचा दावा केला आहे. सुनंदा फेगडे यांनी तर ही घटना म्हणजे ईव्हीएमवरील संशयाचा थेट पुरावा असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे, अशा गंभीर आरोपांवर निवडणूक आयोगाकडून ठोस उत्तर मिळत नसल्याची टीकाही होत आहे.
ईव्हीएमवर प्रश्न म्हणजे लोकशाहीवर गुन्हा?
आज ईव्हीएमवर शंका उपस्थित केली की त्याकडे लोकशाहीवर अविश्वास दाखवणं म्हणून पाहिलं जात असल्याची भावना उमेदवार व्यक्त करत आहेत. “मी मला मत दिलं, ते मत दिसत नाही. मग माझं मत अवैध ठरलं का? की मतदाराचाच अधिकार गौण झाला आहे?” असा प्रश्न फेगडे यांनी उपस्थित केला आहे. ईव्हीएमवर प्रश्न विचारणं म्हणजेच लोकशाहीवर संशय घेण्याचा गुन्हा ठरतो आहे का, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
