दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले काँग्रेसचे खासदार कल्याण काळे देखील दुबईत अडकले आहेत. ते कामानिमित्त दुबईला गेले होते. मात्र आता दुबईत अनेक ठिकाणी इराणकडून हल्ला झाल्याने येथील हवाई वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे दुबईत अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा कुटुंबीयांसोबतचा संपर्क तुटला आहे.
advertisement
दोन दिवसांपूर्वी कल्याण काळे यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाला होता. ते सुरक्षित असल्याचं त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं. कल्याण काळे यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण काळे चर्चेत आले होते. त्यांनी जालन्यातून पाच टर्म खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे सारख्या मातब्बर नेत्याला हरवलं होतं.
त्यांनी एक लाखाहून अधिक मतांनी विजय संपादन केला होता. लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेला हा नेता आता दुबईत अडकल्याची माहिती समोर आल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या कल्याण काळे नेमकं कुठे आहेत? ते सुरक्षित आहेत का? याची कसलीच माहिती अद्याप समोर आली नाही. कुटुंबीयांकडून कल्याण काळेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
