दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव, मात्र पुढे काहीच नाही...
मार्च 2023 मध्ये विधानभवन परिसरातील सध्याचा पुतळा बदलण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन अधिवेशनातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानपरिषदेचे उपसभापती, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रामराजे निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश होता.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, या समितीची आतापर्यंत केवळ एकच संयुक्त बैठक झाली असून त्यानंतर कोणतीही पुढील बैठक झाली नाही. या बैठकीत अश्वारूढ पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तसेच चौथराही बदलण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता.
‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’कडून मॉडेल मागवण्याचा निर्णयही थंडबस्त्यात
या नव्या पुतळ्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट संस्थेकडून दोन मॉडेल्स (आकार/डिझाईन्स) मागवण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, यासंदर्भात सरकारकडून कुठलाही पाठपुरावा झाला नाही, अशी माहितीही समोर आली आहे.
सध्याचा पुतळा बदलण्याचा प्रस्ताव...
छत्रपती शिवाजी महाराजांचा सध्याचा पुतळा सिंहासनावर बसलेला असून, त्यातील सिंहासन हे पुतळ्यापेक्षा मोठं आहे, ही बाब अनेक वेळा अधोरेखित झाली आहे. त्यामुळेच विधानपरिषदेचे आमदार निलय नाईक यांनी याबाबत पुतळा बदलण्याची मागणी फडणवीस सरकारच्या काळातच केली होती. त्यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही यास पाठिंबा दिला होता.
स्मारकाचा मुद्दा विस्मरणात?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि विचारांचा सन्मान करण्यासाठी पुतळा बदलण्याची घोषणा झाली, समित्या स्थापन झाल्या. पण प्रत्यक्षात कोणतीच कृती न झाल्यामुळे या विषयाची स्मृती आता राजकीय विस्मरणात जात आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे.