जळगाव : जळगाव शहरातील अक्सा नगर परिसरात राहणारी 30 वर्षीय हमीदाबी जावेद कुरेशी हिच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. हमीदाबीचा मृत्यू हा आत्महत्येसारखा भासवून प्रत्यक्षात तिचा गळफास देऊन खून करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. हमीदाबीचे आई-वडील आणि भावाने पोलिसांकडे तक्रार देत पती जावेद कुरेशी तसेच सासू, सासरे आणि सासरच्या इतर सदस्यांनी कट रचून तिचा खून केला असल्याचे म्हटले आहे.
advertisement
माहितीनुसार, हमीदाबीच्या मृत्युची बातमी मिळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच माहेरचे लोक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचत पोहचले. मुलीचा मृतदेह पाहताच आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. "माझ्या मुलीचा खून झाला आहे, तिच्यासाठी न्याय मिळालाच पाहिजे," अशी मागणी मृत विवाहितेच्या आईने केली.
सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ
माहेरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ सुरू होता. गेल्या काही महिन्यांपासून विवाहितेकडे पैशांची मागणी देखील सासरचे करत होते. ती पूर्ण न झाल्याने पतीसोबत वारंवार भांडणे होत होती. सासरच्या मंडळींनी पैशासाठी विवाहितेला बेदम मारहाण करून गळफास देऊन तिचा खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. यामुळेच सासरच्या लोकांनी एकत्र येऊन हमीदाबीचा जीव घेतल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जळगाव पोलिसांनी चौकशी सुरू केली असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी
दरम्यान, मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. हामीदाबीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार भावाने व्यक्त केला. पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या संशयास्पद मृत्यूने अक्सा नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. पुढील चौकशीतून हमीदाबीच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.
