जळगाव : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध मतदान केंद्रांवर पहाटेपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये मतदानाबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू असतानाच काही तासांतच एक धक्कादायक घटना समोर आली असून, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
काय घडलं?
जळगाव शहरातील एका मतदान केंद्राच्या परिसरात बोगस मतदान केल्याच्या संशयावरून एका तरुणाला नागरिकांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. संबंधित तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे काही मतदारांच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर बोगस मतदानाचा आरोप करण्यात आला. यावरून उपस्थित नागरिकांमध्ये बाचाबाची झाली आणि पाहता पाहता संतप्त जमावाने त्या तरुणाला मतदान केंद्राच्या परिसरातच चोप दिला.
पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप
घटनेची माहिती मिळताच तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे पुढील अनर्थ टळला. मारहाणीला सामोरे गेलेल्या तरुणाला पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
या घटनेमुळे काही काळ मतदान केंद्र परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तरुण चाळीसगावचा रहिवाशी
पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत संबंधित तरुण हा चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तो जळगाव शहरातील मतदान केंद्रात का उपस्थित होता? त्याच्याकडे मतदानासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे होती का, तसेच तो खरोखरच बोगस मतदानाच्या उद्देशाने आला होता का? याबाबत सखोल तपास सुरू आहे. संबंधित तरुणाकडे ओळखपत्रे आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली जात असून, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
