मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुण्यात भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाहांनी मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते.
अमित शाहांची काय टीका?
पुण्यात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाहांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला. कारण अमित शाह हे जाणून आहेत की या मुद्द्याचा मराठा आरक्षणावर चांगलाच परिणाम होवू शकतो. यावेळी अमित शाहांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. शाह म्हणाले की, “जेव्हा जेव्हा राज्यात भाजपाच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं, तेव्हा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं. परंतु शरद पवारांच्या आणि ठाकरेंच्या नेतृत्वात आघाडी सरकार आलं की आरक्षण जातं. त्यामुळे आता आगामी विधानसभेत जर महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर दिलेलं मराठा आरक्षण पुन्हा जाईल”.
advertisement
जयंत पाटलांचं जोरदार उत्तर:
अमित शाहांच्या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, " अमित शाहांना पूर्ण माहिती आहे की, शरद पवार यांचे सरकार कधीच नव्हतं. पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचे सरकार होतं. त्यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, मात्र देवेंद्र फडणीस यांचं सरकार आल्यानंतर आरक्षण टिकवण्यात काही अडचणी आल्या. आरक्षणाबाबतीत आताच्या सरकारने लोकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे अमित शाहांनी या गोष्टींचा नीट अभ्यास करून बोलणं गरजेचं आहे. खोटे आरोप करून बदनामी नको. आगामी विधानसभा महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढणार आहे.
त्यामुळे आता मराठा आरक्षणावरून अमित शाहांनी थेट राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवारांवर निशाणा साधला आहे. जयंत पाटलांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण फक्त भारतीय जनता पक्षच कशा प्रकारे देऊ शकतो, हे देखील अमित शाहांनी यावेळी पटवून देण्याचा प्रयत्न केला. एकंदरीतच लोकसभेला आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेलं डॅमेज कंट्रोल करण्याचा मानस भाजपाचा दिसत आहे. त्यामुळे आरक्षणावरून भारतीय जनता पक्ष आता नेमकी काय रणनीती आखणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शरद पवारांच्या काळातच मराठा आरक्षण...' अमित शाहांचे शरद पवारांवर गंभीर आरोप
