या टोळीचे नेटवर्क देशपातळीवर असून, या माध्यमातून मिळणारी फसवणुकीची रक्कम प्रथम क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केली जायची आणि त्यानंतर हवालामार्फत भारतात पाठवली जात होती. पोलीस तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, ही रक्कम थेट ललित कोल्हेंपर्यंत पोहोचत होती. दिल्ली येथून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. ललित कोल्हे हे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.
advertisement
‘व्हीपीएन’च्या माध्यमातून व्हायची लूट
ममुराबाद येथील कॉल सेंटरमध्ये ‘व्हीपीएन’च्या माध्यमातून एक आयपी पोर्टल लॉग इन करून, अॅमेझॉनच्या ग्राहकांचा डेटा मिळवला जात होता. त्यानंतर ‘एक्सलाइट’ या कॉलिंग अॅपच्या सहाय्याने विदेशातील ग्राहकांना कॉल करून, त्यांच्या खात्यांमध्ये काहीतरी अडचण आहे, असे सांगून फसवले जात होते. यामध्ये भारताचा कंट्री कोड दिसत नसे, त्यामुळे फसवणूक लक्षात येणे कठीण होते.
कॉल सेंटरमध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील कर्मचारी
या कॉल सेंटरमध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि राजस्थान येथून आणलेले कर्मचारी काम करत होते. अमेरिका व कॅनडामधील वेळेनुसार कॉलिंग चालू राहावे, यासाठी रात्री ७ ते पहाटे ३ पर्यंत कॉलिंग चालायचे. ही संपूर्ण यंत्रणा संगणकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालवली जात होती. या कॉल सेंटरचे मुख्य व्यवस्थापन राकेश आगारिया व नरेंद्र आगारिया या दोघांकडे होती. त्यांच्याकडे ललित कोल्हे यांच्या एल.के. फार्मवर रेकीचेही काम होते. कॉलिंगसाठीचे कर्मचारी, संगणक, इंटरनेट सेटअप, सॉफ्टवेअर या सगळ्याची व्यवस्था त्यांनी केली होती. या दोघांचा ललित कोल्हे यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचेही तपासात समोर आले आहे.
11 जणांवर गुन्हा दाखल
जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. मुस्तफा बेग हिसाबेक मिर्झा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खालील ११ जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात राकेश चंदू आगारिया (रा. वाघ नगर, जळगाव), ललित कोल्हे (रा. कोल्हे नगर), नरेंद्र चंदू आगारिया (रा. वाघ नगर), आदिल सैय्यद (मालाड, मुंबई), इम्रान खान (कांदीवली, मुंबई), मोहम्मद जिशान, शाहबाज आलम, साकीब आलम, मोहम्मद हाशिर (सर्व हावडा, पश्चिम बंगाल), तसेच ‘अकबर’ व ‘ऋषी’ (पूर्ण नाव माहित नाही)
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात जणांना पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास अधिक व्यापक व्हावा म्हणून पोलिसांनी एकूण २० कारणे रिमांडसाठी सादर केली होती. त्यात आरोपींमध्ये असलेले नेटवर्क, फसवणुकीची पद्धत, आर्थिक व्यवहार, प्रशिक्षण कुठून मिळाले, आणि फसवणुकीची एकूण रक्कम यांचा शोध घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी रिमाइंड नोट मध्ये म्हटले होते. त्यामुळे जळगावमधील ही कारवाई आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचं एक मोठं रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास अधिक खोलात जाऊन केला जात असून, अजून काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.