जालन्याच्या १६ प्रभागातील ६५ जागांसाठी निवडणूक झाली. निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाने ४१ पेक्षा अधिक जागा जिंकल्या. याचाच अर्थ भाजपने जालना महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळवली आहे. या निकालांत बॉम्बस्फोट आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगरकर यांच्या विजयाची देशभर चर्चा होत आहे.
कोण आहेत श्रीकांत पांगरकर?
श्रीकांत पांगरकर यांची ओळख कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता अशी आहे. एकसंध शिवसेना असताना त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले होते. २०१८ मध्ये बॉम्ब बनविण्यासाठी लागणारे साहित्य पांगरकर यांच्याकडून जप्त करण्यात आले होते. दहशतवाद विरोधी पथकाने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी राजकारणात जम बसवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. परंतु प्रखर टीका झाल्याने एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पक्ष प्रवेश थांबवला.
advertisement
गौरी लंकेश हत्या प्रकरण
पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरूमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कट्टर धर्मांध विचारांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे सांगितले गेले. या प्रकरणाचे आरोप श्रीकांत पांगरकर आणि काही आरोपींवर करण्यात आले. या प्रकरणात अनेकांवर अटकेची कारवाई करण्यात आली.
जालना महापालिका निवडणूक निकालाचे कल
भारतीय जनता पक्ष-४१
शिवसेना शिंदे-१२
एमआयएम-०२
ठाकरे सेना-००
काँग्रेस-०९
राष्ट्रवादी-००
