गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१) आणि महादेव दगडू बेद्रे (वय २०) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दुपारपासूनच अंबड परिसरात वातावरण ढगाळ झाले होते. हवामान विभागाने राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार सायंकाळनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
झाडाचा आसरा घेतला पण....
advertisement
पावसापासून वाचण्यासाठी गोविंद, महादेव आणि त्यांच्यासोबत असलेला आणखी एक तरुण लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. मात्र, याचवेळी अचानक त्या झाडावर वीज कोसळली. विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने गोविंद आणि महादेव यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा तरुण गंभीररित्या भाजला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तरण्याबांड पोरांच्या मृत्यूने गावकऱ्यांमध्ये हळहळ
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. पुणे, जालना, धाराशिव, सातारा आदी भागांत सोमवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी अशा हवामानात विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली उभे राहणे टाळावे, तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन शासन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
