जालना - ग्रामीण भागातील मुलेही आता विविध क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेत आहेत. प्रशासकीय अधिकारी पद असो किंवा पोलीस भरती, सैन्य भरती याचबरोबर डॉक्टर, इंजीनिअर होण्यातही ग्रामीण पार्श्वभूमी असणारे मुले कुठेही मागे राहिले नाहीत. यातच आता आणखी एक प्रेरणादायी बाब म्हणजे रिक्षा चालवणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलाची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून या तरुणाने हे यश मिळवले आहे. जाणून घेऊयात ही प्रेरणादायी कहाणी.
advertisement
अजिंक्य सुरवसे असे या तरुणाचे नाव आहे. तो जालना जिल्ह्यातील सावरगाव हडप येथील रहिवासी आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात तर आई मोलमजुरी करते. अशा सामान्य परिस्थितीतूनही त्याने आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला आणि आता त्याची भारतीय सैन्यदलात सैनिक म्हणून निवड झाली आहे.
भारतीय सैन्य दलात अग्निवीर या योजनेंतर्गत जवान (सैनिक) पदासाठी गेल्यावर्षी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये राज्यभरातून अनेकांनी परीक्षा देत नशीब आजमावले. या परीक्षेचा उशिरा का होईना नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जालना तालुक्यातील सावरगाव हडप या छोट्याशा गावातील रिक्षा चालक राधेश्याम सुरवसे यांच्या मुलाची जवान (फौजी) म्हणून निवड झाली आहे.
अजिंक्य हा सैन्य दलात भरती होण्यासाठी अनेक महिन्यांपासून तयारी करीत होता. अखेर त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने वडील राधेश्याम सुरवसे यांनी रामनगर ते जालना ऑटो रिक्षाने प्रवासी वाहतूक करून अजिंक्यचे शिक्षण पूर्ण केले. मुलानेही वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून परिस्थितीचा बाऊ न करता अथक परिश्रमातून भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
माझ्या मुलाला दोन वेळा अपयश आले. तरीदेखील तो खचला नाही. त्याच्या या यशात त्याच्या आईचाही मोठा वाटा आहे अनेकदा मी हे सगळे सोडून दे, असे म्हणत. मात्र, त्याच्या आईने त्याला खंबीर पाठिंबा देत माझ्या माघारी पैसे दिले. मोलमजुरी करून वाचवलेल्या पैशातून त्याचा सराव आणि इतर गोष्टी झाल्या. आज तो देशाच्या सेवेत जात असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्याने आमच्याबरोबरच आमच्या कुटुंबाच आणि गावाचे नाव देखील मोठे केले आहे, अशी भावना अजिंक्यचे वडील राधेश्याम सुरवसे यांनी व्यक्त केली. दरम्यान, अजिंक्यच्या या यशानंतर गावकऱ्यांच्या वतीने त्याची जंगी मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.