मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्ट 2023 पासून आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने हे प्रकरण राज्यभर पसरले. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकवट्याने आंदोलनाला व्यापक स्वरुप प्राप्त झालं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करत समाजाला एकत्र करण्याच काम केलं. नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा आरक्षण मोर्चा काढला होता. त्यानंतर वाशी येथे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करणारा अध्यादेश त्यांना दिला होता. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला.
advertisement
जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार
मनोज जरांगे यांच्या चलो मुंबई आंदोलनानंतर राज्य सरकारने नवा जीआर काढला. सगेसोयरे असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे यांची मागणी सरकारकडून मान्य करण्यात आली. राज्य सरकारच्या या जीआरनंतर जरांगे रायगडावर आले. रायगडावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे. 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारकडून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडल्या जात आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तुम्ही एकीकडे सगळ्यांनी मिळून सग्या सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश आणायचा आणि ओबीसींना केंद्रापर्यंत जाऊ असं सांगायचं, या दोन भूमिका का? असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला आहे.
‘अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करा, अंतरवालीसह राज्यातले गुन्हे अजूनही मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. सरकारच्या माध्यमातून वेगवेगळी वक्तव्यं करण्यात येत आहेत, त्यामुळे तुमची भूमिका आम्हाला कळत नाही. हैदराबादचं गॅझेट स्वीकारू सांगितलं, पण अजूनही या गोष्टी झालेल्या नाहीत. सगे सोयरेंची प्रक्रिया अर्ज दाखल झालेले असतानाही सुरू झालेली नाही,’ असं जरांगे म्हणाले.
