जालना : जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याचे आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी पाणीसाठा जेमतेम शिल्लक असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे जनावरांच्या तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील भविष्यात उद्भवू शकतो. असे असताना जालना जिल्ह्यातील महत्त्वाचा मध्यम प्रकल्प असलेल्या कल्याण गिरिजा मध्यम प्रकल्पामधून मात्र लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यम प्रकल्पाला असलेल्या कालव्याजवळ लिकेज असून हे लिकेज दुरुस्त करण्याची मागणी गावकरी करत आहेत. याबाबत लोकल 18 च्या प्रतिनिधीने थेट गावकऱ्यांशी संवाद साधला पाहुयात.
advertisement
जालना जिल्ह्यामध्ये एकूण सात मध्यम तर 63 लघु प्रकल्प आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतेक लघु प्रकल्प भरले होते. तर कल्याण मध्यम हा मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित सहा मध्यम प्रकल्पांमध्ये देखील समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यापैकीच एक असलेल्या कल्याण गिरिजा मध्यम प्रकल्पाच्या कालव्यामधून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकण नव्हे, हे तर सोलापूर! नारळाच्या शेतीतून लाखोंची कमाई, शेतकऱ्यानं कशी केली कमाल?
मागील चार महिन्यांपासून हे पाणी सातत्याने सुरू असल्याचे पाहायला मिळते. शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसताना हे पाणी सुरूच असून यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे लघु व पाटबंधारे विभागाने या गळतीची दुरुस्ती करावी अशी मागणी सावंगी तलाव व दहिफळ येथील ग्रामस्थ करत आहेत.
कल्याण गिरिजा मध्यम प्रकल्प येथील कालव्यामधून मागील चार महिन्यांपासून सातत्याने पाणी सुरू आहे. शेतकऱ्यांमधून मागणी नसताना देखील हा पाण्याचा अपव्यय सुरू आहे. आसपासच्या परिसरातील दहा गावांची या प्रकल्पातील पाणी हीच संपत्ती आहे. पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजेच पाणी आहे. पाटबंधारे विभागाला विविध माध्यमातून संपर्क साधून आम्ही तक्रार केली. मात्र विभागाने यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याची खंत शंकर राठोड यांनी व्यक्त केली. पाटबंधारे विभागाने आमच्या मागणीची दखल न घेतल्यास विभागाच्या कार्यालयात आम्ही गावकरी मिळून उपोषण करू असा इशारा गावकरी राठोड यांनी दिला आहे.





