जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. दोन दिवसांपूर्वी पारद गावामध्ये जोरदार पाऊस झाला या पावसाने संपूर्ण गावातील पाणी हे जिल्हा परिषदेच्या शाळेत जमा झालं. या पाण्यामध्ये दोन ते तीन विषारी साप आहेत. त्याचबरोबर बेडूक, खेकडे, विंचू असे प्राणी असण्याचा धोका आहे. या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
advertisement
यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर माध्यम भोजन योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या खिचडी बनवण्याच्या शेडची देखील मोठी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळेच्या दुरावस्थेची दखल घेऊन पायाभूत सुविधा निर्मिती करावी, अशी मागणी ग्रामस्थ सागर देशमुख यांनी केली आहे.
मी इयत्ता सहावीमध्ये शिकते. आम्ही शिकत असताना पाण्यात असलेले बेडूक डराव डराव करतात सरांचा आवाज देखील आम्हाला ऐकायला येत नाही. त्याचबरोबर या पाण्यामध्ये साप देखील आहेत. त्यामुळे शाळेत येण्याची भीती वाटते. अधिकाऱ्यांनी आमच्या शाळेत सोयीसुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने केली आहे.





