रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपालिकेत यंदा नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे अनेक महिला नेत्यांनी या पदासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ अलिबाग नगरपालिकेवर शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) एकछत्र वर्चस्व राहिले आहे. यंदाही शेकापच बाजी मारण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.
शेकापने शेवटी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या अक्षया प्रशांत नाईक यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही घोषणा पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार जयंत पाटील यांनी अधिकृतपणे केली. अलिबाग नगरपालिकेत शेकापचे मजबूत संघटन आहे. स्थानिक पातळीवरील सक्रियता आणि मागील कार्यकाळातील विकासकामांचा उल्लेख करत अक्षया नाईक यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
advertisement
शिंदे गटाविरोधात थेट लढत?
अलिबागमध्ये शेकाप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. शिवसेना (शिंदे गट)कडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नसली तरी लवकरच अधिकृत नाव जाहीर होण्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत कोणती महिला उमेदवार विरोधक म्हणून उभी राहते, याकडे स्थानिकांचे लक्ष आहे.
महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार...
यावेळी जयंत पाटील यांनी “अलिबागमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही लढाई लढत आहोत,” असे स्पष्ट केले आहे. अक्षया नाईक यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शेकापसह महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे शेकापकडून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना जागावाटपात किती जागा मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
