राष्ट्रवादी शरद पवार गटाने या प्रक्रियेतून एक महत्त्वाची राजकीय घडामोड पुढे आली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. ऋता आव्हाड या सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क देखील आहे. आता, त्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
advertisement
कधीकाळच्या कट्टर समर्थकाविरोधात आव्हाड मैदानात...
जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड या कळवा प्रभाग क्रमांक २३ मधून लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. याच प्रभागात जितेंद्र आव्हाड यांचे कधीकाळचे कट्टर समर्थक मिलिंद पाटील नगरसेवक आहेत. पाटील काही महिन्यांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांची साथ सोडत काही नगरसेवकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे आव्हाड यांना मोठा धक्का बसला. आता, त्याच कट्टर समर्थकाविरोधात आव्हाड मैदानात उतरले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे कळवा, मुंब्रा, विटावा, ठाणे शहर, घोडबंदर, वागळे, कोपरी आणि पांचपाखाडी अशा विभागांमधून तब्बल ७३ इच्छुकांनी आपले अर्ज सादर केले आहेत. इच्छुकांची ही मोठी संख्या पाहता महाविकास आघाडीत जागा वाटपाचाही तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, ऋता आव्हाड आणि मिलिंद पाटील यांच्यातील संभाव्य लढत ही हायव्होल्टेज ठरण्याची शक्यता आहे.
