बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली. आज त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी शिवनी आरमाळ येथे झाला. यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेकडो शेतकरी , महिला शेतकरी उपस्थित होत्या.
यावेळी कैलास नागरे यांच्या भगिनी असलेल्या सत्यभामा नागरे यांनी राजकारण्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. माझ्या भावासमोर आत्महत्या हा शब्द वापरू नका. बलिदान हा शब्द वापरावा, असं भावनिक आवाहनही सत्यभामा नागरे यांनी केलं.
advertisement
माझ्या भावाला हे माहित होतं की या देशात बलिदान दिल्याशिवाय काहीही होत नाही आणि म्हणून त्याने शेतकऱ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे. देशाला राजकारणी हे कृषी प्रधान म्हणतात. यांना लाजा वाटायला पाहिजे की, कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतो आणि तेही पाण्यासाठी... आपले पालकमंत्री यांना वारंवार माझ्या भावाने विनंती केली मात्र... अशा पालक मंत्र्यांना पालकत्व स्वीकारता येत नसेल तर कशाला पालकत्व स्वीकारतात...? लाजा वाटल्या पाहिजे...! असे खडे बोलही सत्यभामा नागरे यांनी सुनावले.
रक्षा विसर्जनवेळी सत्यभामा नागरे यांनी राजकारणांना सुनावलेले खडे बोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि स्थानिक आमदार मनोज कायंदे हे खाली मान घालून ऐकत राहिले.
