नागपूर: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर जाणार का, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगरच्यावतीने 5ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाबाबत डॉ. राजेंद्र गवई यांनी मौन सोडत पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे.
advertisement
संघाच्या या कार्यक्रमाला माजी राज्यपाल आणि रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते रा.सू. गवई यांच्या पत्नी आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांना निमंत्रण देण्यात आले आहे. प्रमुख अतिथीमध्ये त्यांचे नाव होते. कार्यक्रम पत्रिकेवर त्यांचे नाव छापण्यात आले होते. त्यावरून आंबेडकरी चळवळीसह पुरोगामी वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले. त्यांच्यावर टीकेचाही भडिमार सुरू झाला.
या सगळ्या वादावर आता कमलताई गवई यांचे सुपुत्र आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांचे बंधू डॉ. राजेंद्र गवई यांनी जाहीर भाष्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याच्या निमंत्रण कमलताई गवई यांना मिळाले. त्यांनी ते स्वीकारले असून कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. गवई यांनी दिली. यापूर्वीही या कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते राजाभाऊ खोब्रागडे, दादासाहेब गवई हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. गवई परिवाराचे यापूर्वी पक्ष विरहित संबंध राहिलेले आहेत. प्रत्येक पक्षामध्ये त्यांचे संबंध होते, असेही डॉ. गवई यांनी म्हटले.
दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे नजीकचे संबंध होते. गंगाधर फडणवीस यांच्याशी भावाभावासारखे संबंध होते, याकडेही डॉ. गवई यांनी लक्ष वेधले. वैचारिक मतभेद वेगळे असले तरी वैयक्तिक संबंध होते. एकमेकांच्या कार्यक्रमात गेले पाहिजे. कार्यक्रमात गेल्याने आपण विचारधारा स्वीकारतो असं नाही ही बाबही राजेंद्र गवई यांनी अधोरेखित केली. आम्ही विचारधारेचे पक्के आहोत. भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यामुळे अनेक लोकांच्या पोटात दुखते. त्यामुळे लोक अशा चुकीच्या टीका करत आहेत. मात्र अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे उत्तम राहणार असल्याचे डॉ. राजेंद्र गवई यांनी म्हटले.