नेमकी घटना काय?
१३ जानेवारी २०२६ रोजी जामडी फॉरेस्ट शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास केला असता, हा मृतदेह राजू रामचंद्र पवार या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना तुटलेली चप्पल, फुटलेला मोबाईल आणि अंडरपॅन्ट वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली आढळली, ज्यामुळे हा प्रकार अपघाती नसून घातपात असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत होतं.
advertisement
खुनाचा उलगडा कसा झाला?
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्नड ग्रामीण पोलिसांच्या पथकाकडून अत्यंत वेगाने सुरू होता. सलग आठ दिवस चाललेल्या या तपासात पोलिसांनी ५० पेक्षा जास्त संशयितांची चौकशी केली. मात्र, सुरुवातीला कोणतीही ठोस माहिती समोर येत नव्हती. मात्र पोलिसांनी राजू पवार हे बंजारा समाजातील असल्याने पोलिसांनी त्या समाजातील काही लोकांची कसून चौकशी केली. यावेळी एका महिलेकडं संशयाची सुई गेली.
अनैतिक संबंध आणि मुलाची साथ
पोलिसांनी संशयावरून एका महिलेला आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतलं. त्यांची सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली. राजू पवार यांच्याशी असलेल्या अनैतिक संबंधांना कंटाळून त्या महिलेने आपल्या मुलाच्या मदतीने त्यांच्या खुनाचा कट रचला. २० जानेवारीच्या रात्री उशिरा पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
बुधवारी या संशयित माय-लेकांना कन्नड न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी (पीसीआर) सुनावली आहे. या खुनामागे आणखी कोणाचे हात आहेत का किंवा या घटनेचा अन्य काही पैलू आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
