राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नुकतेच राजीनामा दिलेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या घरी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिवाळी निमित्त भेट दिली. ही भेट औपचारिक शुभेच्छा भेट असली तरी, राजकीय वर्तुळात मात्र तिचा अर्थ वेगळाच लावला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र फाळके हे कर्जत-जामखेड मतदारसंघातील पक्षाचे एक प्रभावी आणि विश्वासू नेते मानले जात होते. शरद पवार यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पत्रात त्यांनी “वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत आहे. असे नमूद केले असले, तरी पक्षातील काहींना विश्वासात न घेतल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला होता.
advertisement
भाजपात प्रवेश?
फाळके यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष ठरली आहे. भाजप नेते आणि सभापती राम शिंदे यांनी फाळके यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने, फाळके भाजपात प्रवेश करणार का? या चर्चेला आता उधाण आलं आहे.
रोहित पवारांना धक्का?
कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या आमदार रोहित पवार यांचे वर्चस्व असले, तरी फाळके हे त्यांचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे फाळके यांच्या भूमिकेमध्ये झालेला बदल हा रोहित पवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, फाळके हे संघटनात्मकदृष्ट्या सक्षम आणि गट बांधणीत पारंगत नेते आहेत. त्यांचा भाजपा प्रवास सुरू झाला तर, कर्जत-जामखेडमधील समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.
दरम्यान, दोन्ही नेत्यांनी ही भेट ‘दिवाळीच्या शुभेच्छांसाठी’ असल्याचे सांगितले असले, तरी राजकीय पातळीवर मात्र या भेटीचे परिणाम लवकरच दिसू लागतील, अशी चर्चा जिल्हाभर रंगली आहे.
