अनंत चतुदर्शीच्या दिनी मुंबईसह राज्यात गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे रात्रीपर्यंत गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. शनिवारी, सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. सुमारे ३६ तासांनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.
लालबाग, चिंचपोकळी, भायखळा, गिरगाव अशा मार्गाने लालबागच्या राजाचे विविध ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. या दरम्यान गणेशभक्तांची अलोट गर्दी लोटली होती. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लालबागचा राजा भायखळा येथील हिंदुस्थानी मशिदीसमोर पोहोचला होता. त्या ठिकाणी बाप्पाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी पोहोचण्यास लालबागचा राजाला 11 तासांचा वेळ लागला. त्यानंतरही लालबागचा राजाला गिरगाव चौपाटी येथे पोहचण्यासाठी सकाळ उजाडली. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. मात्र, भरतीमुळे तराफा आणि मूर्तीचा पाट जुळून आला नाही. त्यामुळे ओहोटीची प्रतिक्षा करावी लागली. बाप्पा गिरगावच्या चौपाटीवर येऊन सुमारे १२ तास थांबला होता.
advertisement
समुद्राला उधाण, विसर्जनाला उशीर, भक्तांची काळजी...
जवळपास 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजाची मिरवणूक वाजतगाजत गुलाल उधळत गिरगाव चौपाटीवर दाखल झाली. बाप्पाच्या निरोपाची तयारी सगळी पूर्ण झाली. मात्र, भरतीच्या बदललेल्या वेळेमुळे विसर्जनाचे गणित बिघडले. आज सकाळी लालबागचा राजा चौपाटीवर दाखल झाल्यावेळी भरतीचे पाणी वेगाने वाढत होते. मूर्ती समुद्रकिनाऱ्यावर आणल्यानंतर विसर्जनासाठी सजवलेला तराफा आणि मूर्ती ठेवलेला पाट यांची भरतीच्या उंच लाटांमुळे जुळवणी होत नव्हती. भरतीचे पाणी इतके वाढले की मूर्तीचा पाट समुद्रात तरंगू लागला.
सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ओहोटी सुरू होईल असा अंदाज होता. मात्र, लाटांची तीव्रता कमी झाली नव्हती. त्यामुळे तराफा आणि मूर्तीचा पाट जुळवण्यात अडचणी येत होत्या. जवळपास 4 तास लालबागचा राजा हा पाण्यात होता. मात्र, तराफा जोडता येत नसल्याने बाप्पााच्या विसर्जनाला वेळ लागला होता. कोळी बांधवांकडून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, समुद्रापुढं त्यांचंही काही चालत नव्हते. विसर्जनाची वाढती वेळ पाहून भक्तांच्या काळजाचा ठोका चुकत होता. बाप्पााच्या निरोपामुळे आधीच भावूक झालेल्या भक्तांच्या मनावर चिंता वाढू लागली होती.
कोळी बांधवांना मान...
परंपरेनुसार, लालबागचा राजाच्या विसर्जनाचा मान कोळी बांधवांना देण्यात आला. कोळी बांधवांकडून राजाचे मानाने विसर्जन करण्यात आले. तराफासोबत कोळी बांधवांच्या बोटी देखील समुद्रात होत्या.
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी...
मागील 10 दिवसांपासून तहानभूक विसरुन बाप्पाची सेवा करण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. आज त्या बाप्पााला निरोप देताना कार्यकर्ते आणि भाविकांना अश्रू अनावर झाले. गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला असं म्हणतानाच 'निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी', अशी भावना यावेळी गणेशभक्तांच्या मनात लोटली होती.