लातूर : कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी एका सावकाराने कर्जदाराला किडनी विकायला भाग पाडल्याची घटना समोर असताना एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने घराचं कर्ज फेडण्यासाठी आणि १ कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स लाटण्यासाठी एका निष्पाप व्यक्तीला जिवंत जाळलं. लातूरमधील कार जळीत कांडाने अवघा महाराष्ट्र हादरला. पण, आता या आरोपी गणेश चव्हाणाने हे कृत्य का केलं, याची माहिती समोर आली आहे.
advertisement
औसा तालुक्यातील वानवडा येथील एका कारमध्ये जाळून मारणारा आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण (रा. विठ्ठल नगर, औसा) हा मागील काही काळापासून आर्थिक विवंचनेत होता. त्याच्यावर विविध कर्जांचं ओझं होतं. गणेश चव्हाणवर सुमारे 47 लाख रुपयांचं कर्ज होतं अशी माहिती समोर आली. त्याने एक फ्लॅट सुद्धा घेतला होता. तसंच इतरही कर्ज त्याच्यावर होतं. त्यामुळे त्याला दरमहा सुमारे 75 हजार रुपयांचा हप्ता भरावा लागत होता. डोक्यावर इतकं कर्ज झाल्यामुळे कर्जाच्या ताणामुळे तो आत्महत्या करण्याचाही विचार करत असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
टर्म इन्शुरन्स लाटण्याचा प्लॅन
गणेश चव्हाण याची कौटुंबिक माहितीही समोर आली आहे. आरोपी गणेश चव्हाणला 6 वर्षांची मुलगी आणि 3 वर्षांचा मुलगा असून कुटुंबाच्या भवितव्याची चिंता त्याच्या मनात होती. त्याने एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढलं होतं. फायनान्स क्षेत्रात असल्यामुळे टर्म इन्शुरन्सचे पैसे लाटण्याच्या क्रुर प्लॅन त्याच्या डोक्यात आला. या पैशातून कर्ज फिटेल या हेतूनं त्यानं हा अमानवी कट रचल्याचं निष्पन्न झालं आहे.
शनिवारी रात्री काय घडलं?
दिनांक 13 डिसेंबर रोजी रात्री औसा येथील याकतपूर मोड परिसरात आरोपी स्कोडा कारमधून जात असताना गोविंद किसन यादव (वय 50...रा. पाटील गल्ली, औसा, मूळ रा. बोरफळ) यांनी लिफ्ट मागितली. गोविंद यादव हे दोन ते अडीच एकर शेतीवर उदरनिर्वाह करून तर कधी मजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करणारे होते. त्यांच्या पश्चात 02 मुलं, शेती आणि कुटुंब असा परिवार आहे.
पोलीस तपासानुसार, आरोपीने गोविंद यादव यांना गाडीत बसवून औसा टी-पॉईंट मार्गे पुढे नेलं. आरोपी गणेश चव्हाण याने गोविंद यादव यांना एका धाब्यावर दारू पाजवली, चिकन खाऊ घातलं. त्यानंतर दारूच्या नशेत असताना वानवडा पाटी–वानवडा रस्त्यावर नेलं. यादव झोपेत गेल्यानंतर आरोपीने गोविंद यादव यांना ड्रायव्हर सीटवर बसवून सीट बेल्ट लावला, तसंच त्याला बांधून ठेवलं आणि वाहनात ज्वलनशील साहित्य ठेवून कारला आग लावली. यावेळी आरोपीनं कारच्या पेट्रोल टाकीचं झाकण ही उघडं ठेवलं होतं.
14 डिसेंबर रोजी मध्यरात्री वाहन जळत असल्याची माहिती डायल 112 वर मिळाल्यानंतर औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अर्धवट जळालेला मानवी हाडांचा सांगाडा आढळून आला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र तपासात वाहन आरोपीच वापरत असल्याचे समोर आले.
विवाहित मैत्रिणीशी चॅटिंगमुळे गणेश सापडला
स्थानिक गुन्हे शाखा आणि औसा पोलिसांच्या संयुक्त तपासात आरोपी जिवंत असल्याचा संशय बळावला. त्यानंतर आरोपी गणेश चव्हाण हा त्याच्या एका विवाहित मैत्रिणीशी एका नवीन नंबरवरून चॅटिंग करत असल्यामुळे पोलिसांना या घटनेचा सुगावा लागला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रं फिरवली. अगोदर कोल्हापूर आणि नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथून मोबाईल टॉवर लोकेशन वरून आरोपीला विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली.
गणेश चव्हाणाला 5 दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला 05 दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे. एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी, कर्जाच्या ओझ्याखाली केलेल्या या अमानवी कृत्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून लातूर पोलिसांच्या जलद व अचूक तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
