संसद भवनात स्मोक कँडल पेटवणारा तरुण हा चाकूर तालुक्यातील झरी (नवकुंडाची) येथील अमोल धनराज शिंदे (वय 25) हा असल्याचं स्पष्ट झाले आहे. अमोल शिंदे याच्या घरची परिस्थिति बेताची आहे. आई वडील मजूरी करतात. अमोल शिंदे हा सैन्यभरतीची तयारी करत होता, अशीही माहिती समोर आली आहे. अमोल शिंदे याच्या झरी येथील घरी चाकूर पोलीस दाखल झाले असून अमोल शिंदेच्या आई वडिलांची चौकशी करत आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शिंदेच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता.
advertisement
तरुणाची मानसिक स्थिती ठीक नव्हती : मंत्री संजय बनसोडे
पालकमंत्री संजय बनसोडे म्हणाले, की जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी बोलणं झालं. पोलीस प्रमुखांनी त्या मुलाच्या आई वडिलांशी चर्चा केली. त्या मुलाचं नाव अमोल शिंदे आहे. आमच्याच जिल्ह्यातील आहे. हा मुलगा मागील काही वर्ष पोलीस भरतीची तयारी करत होता. परंतु, त्याला त्यामध्ये अपयश आलं होतं. त्याची थोडी मानसिक अवस्था ठिक नव्हती. संबंधित तरुण कोणत्या पक्षाशी किंवा विचारधारेशी संबंधित होता का? याबाबत देखील पोलीस कसून चौकशी करत आहेत. अद्याप तरी ही बाजू समोर आलेली नाही. आम्ही ही बाब गांभीर्याने घेतली आहे. कारण संसदेत सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक असते. अशा वेळी सुरक्षा व्यवस्था भेदून आत जाणे तितकं सोप्प नाही. आम्ही त्याला पास कुणी ऊपलब्ध करुन दिले आहेत, याची देखील चौकशी करत आहोत. दुसरीकडे लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील झरी गावात अमोल शिंदे यांच्या घरी लातूरचं दहशतवाद विरोधी पथक दाखल झालं आहे. दहशतवाद विरोधी पथक अमोल शिंदे याच्या आई वडिलांची चौकशी करणार आहे.
वाचा - लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या लातूरच्या तरुणाचे फोटो समोर, सैन्यभरतीचं होतं स्वप्न
संसदेवर स्मोक अटॅक करणांऱ्यांमध्ये एकूण सहाजण
नीलम, अमोल शिंदे, सागर शर्मा आणि मनोरंजन डी अशी संसदेच्या आत आणि बाहेर गोंधळ घालणाऱ्या चार आरोपींची नावे आहेत. यातील नीलम हिसार, हरियाणाची रहिवासी असून तिचे वय 42 वर्षे आहे. अमोल शिंद हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी असून त्याचे वय 25 वर्षे आहे. तर सागर शर्मा आणि मनोरंजन डी हे कर्नाटकचे रहिवासी असले तरी दोघेही वेगवेगळ्या शहरातील आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संसदेत गोंधळ करणारे चारही आरोपी एकमेकांना आधीच ओळखत होते. दरम्यान, या प्रकरणात संसदेच्या एकूण 6 जणांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. दोन आत, दोन बाहेर आणि दोन फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
