खरं तर चंद्रपूर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवर या चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी आग्रही होत्या. त्यांनी दिल्लीत काँग्रेस हायकमांडकडे उमेदवारीसाठी साकडं घातलं होतं. तर विजय वडेट्टीवारांनीही आपल्या कन्येसाठी दिल्लीत फिल्डिंग लावली होती.
प्रतिभा धानोकर यांनीही उमेदवारीसाठी सर्व राजकीय शक्तीपणाला लावली होती, त्यामुळे निवडणुकीआधीच काँग्रेसमधील कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावर आलं होतं. काँग्रेसकडून चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी धानोरकर की वडेट्टीवारांना मिळणार याविषयी उत्सुक्ता निर्माण झाली होती. पण पक्षांतर्गत चाढाओढीत प्रतिभा धानोकर यांचं पारडं जड ठरलं.
advertisement
इकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी धानोरकर आणि वडेट्टीवारांमध्ये चुरस लागली होती. तर दुसरीकडे भाजपात या उलट चित्र होतं. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून भाजपने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. खरं तर सुधीर मुनगंटीवार हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते, तसं त्यांनी जाहीरही केलं होतं. पण भाजपनं मुनगंटीवारांची उमेदवारी जाहीर करत राजकीय धक्का दिला.
गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभेतून प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले होते. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करत धानोकरांनी चंद्रपूरची जागा खेचून आणली होती. त्यांच्या निधानामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोकर लोकसभेच्या रंगणात आहेत. एकीकडे अनिच्छेने का होईना मुनगंटीवार लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत, तर दुसरीकडे आपल्या मुलीसाठी उमेदवारीचा प्रयत्न करणारे वडेट्टीवार धानोरकरांना किती मदत करणार? यावर चंद्रपूर लोकसभेचा निकाल ठरणार आहे.