बुलढाणा : देशभरात लोकसभा निवडणुकीला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान शुक्रवारी 19 एप्रिलला झालं तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिलला होणार आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यामध्ये पोस्टल बॅलटने मतदान केल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या वयोवृद्ध महिलेने 12 वाजता मतदान केलं आणि 3 वाजता तिचा मृत्यू झाला. अनुसया नारायण वानखडे असं या महिलेचं नाव आहे.
advertisement
देशात लोकसभा निवडणुकीत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, म्हणून निवडणूक आयोग दिवस रात्र मेहनत घेत आहे. मतदान अधिकारी घरी जाऊनही वृद्धांची मतं पोस्टल बॅलटवर घेत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुडामधील वृद्ध महिलेनेही पोस्टल बॅलटच्या माध्यमातून मतदान केलं. महिलेने दुपारी 12 वाजता मतदानाचा हक्क बजवाला आणि तीनच तासात दुपारी 3 वाजता तिने जगाचा निरोप घेतला.
घरी जाऊन मतदान घ्यायची सुविधा 21 एप्रिलपासून सुरू झाली होती. या बुथचे बीएलओ संजय सातव यांनी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत अनुसया नारायण वानखेडे यांचं पोस्टल मतदान घेतलं. मत दिल्यानंतर 3 वाजता अनुसया वानखेडे यांचा मृत्यू झाला.
