चंद्रपूर : लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मार्च महिन्यात निवडणूक आयोग आचार संहिता लावण्याची शक्यता आहे, यानंतर एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे, तसंच इच्छुकांची संख्याही वाढत आहे.
लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात दोन हेवीवेट 'भाऊ' लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि भाजपकडून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार मैदानात उतरण्याची चिन्हं आहेत. मात्र दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक सोपी नाही.
advertisement
विजयभाऊ आणि सुधीरभाऊ नावाने ओळखले जाणारे दोन्ही नेते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेनं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दोन्ही नेत्यांकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्याने त्यांनी आतापर्यंत मोठं राजकीय यश प्राप्त केलंय.
सुधीर मुनगंटीवार यांचा बल्लारपूर मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातच मोडतो ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तर विजय वडेट्टीवार यांचा ब्रम्हपुरी मतदारसंघ गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येतो. ही त्यांची उणी बाजू म्हणावी लागेल. असं असलं तरी दोन्ही जिल्ह्यावर वडेट्टावार यांचा असलेला प्रभाव नाकारता येणार नाही.
विजय वडेट्टीवार यांच्याप्रमाणेच सुधीर मुनगंटीवारही पक्षानं सांगितल्यास लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेत. मात्र माजी खासदार आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर राजकारणात सक्रीय आहेत, असं असताना सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा सुरू झाल्याने त्यांच्या समर्थकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तर राज्यातील जनतेची सेवा करणं, याला प्राधान्य देत असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर यांना 5 लाख 59 हजार मतं मिळाली होती. भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांना 5 लाख 14 मतं मिळाली होती. वंचितचे राजेंद्र महाडोळे यांना 1 लाख 12 हजार मतं मिळाली होती. काँग्रेसच्या बाळू धानोरकरांनी भाजपचे अहिर यांचा 45 हजार मतांनी पराभव केला होता.
आता 2019 नंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या आहेत. परिणामी विजय वडेट्टीवार आणि सुधीर मुनगंटीवार या दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. आता दोन्ही नेत्यांपैकी कोणता भाऊ दिल्लीत जाणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.