TRENDING:

Dharashiv Loksabha : धाराशिवमध्ये हवा दिराची की भावजयीची? कमी झालेल्या टक्क्याने दोघांना टेन्शन!

Last Updated:

लोकसभा निवडणुकीतले महाराष्ट्रातले सगळे टप्पे पार पडले आहेत. धाराशिवची लढत नात्यागोत्याच्या लढाईमुळे रंजक ठरली. ऐनवेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेत अर्चना पाटील यांना महायुतीकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळवली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बालाजी निरफळ, प्रतिनिधी
धाराशिवमध्ये हवा दिराची की भावजयीची? कमी झालेल्या टक्क्याने दोघांना टेन्शन!
धाराशिवमध्ये हवा दिराची की भावजयीची? कमी झालेल्या टक्क्याने दोघांना टेन्शन!
advertisement

धाराशिव : लोकसभा निवडणुकीतले महाराष्ट्रातले सगळे टप्पे पार पडले आहेत. धाराशिवची लढत नात्यागोत्याच्या लढाईमुळे रंजक ठरली. ऐनवेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेत अर्चना पाटील यांना महायुतीकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळवली. अर्चना पाटील यांनी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना आव्हान दिलं. मतदारसंघात असलेला ओमराजेंचा जनसंपर्क, सामान्य लोकांशी असलेली नाळ याच्या विरोधात अर्चना पाटील यांच्याकडून आव्हान देण्याचा प्रयत्न या लोकसभा निवडणुकीत झाल्याचं पाहायला मिळालं.

advertisement

अर्चना पाटील यांच्या बाजूने शिवसेना नेते तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, अर्चना पाटील यांचे पती भाजप आमदार राणा पाटील, पावसाचे आमदार अभिमन्यू पवार, बार्शीचे भाजप आमदार राजा राऊत, माजी आमदार बसवराज पाटील या मातब्बर नेत्यांनी मोठं बळ उभा केलं होतं. त्यातल्या त्यात तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात रंगलेल्या शाब्दिक युद्धाने ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली. ओमराजे निंबाळकरांचा असलेला जनसंपर्क, फोनवर लोकांच्या संपर्कात राहणे या गोष्टी चर्चिल्या गेल्या. एकीकडे सगळे मातब्बर नेते असताना लोकांशी कायम संपर्क राहणे, फोन उचलणे या गोष्टी शेवटपर्यंत ओमराजे निंबाळकरांनी प्रचारात आपल्या पथ्थ्यावर पाडून घेतल्या.

advertisement

पाटील कुटुंबाकडून ओमराजे निंबाळकर यांच्यावर आक्रमक टीका झाली नाही. जेवढी टीका पालकमंत्री सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली त्यामुळे या निवडणुकीत थोडी रंगत पाहायला मिळाली. नेते एका बाजूला आणि सामान्य जनता एका बाजूला, असंच काहीसं चित्र या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं. तेरणा ट्रस्ट, तेरणा कारखाना, पश्चिम महाराष्ट्राकडून येणारे 25 टीएमसी पाणी, मेडिकल कॉलेज याच मुद्द्यावर ही निवडणूक आरोप प्रत्यारोपात गाजली.

advertisement

विकासाच्या मुद्द्याचा निवडणुकीत विसर

विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुरुवातीपासूनच ही निवडणूक वैयक्तिक आपल्या भोवती केंद्रित ठेवली. सोयाबीनचा भाव, कांद्याचे दर, दूध दर यावरून ओमराजे निंबाळकर यांनी प्रचारात आघाडी घेतली. त्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यासारखे मुद्दे संसदेत उपस्थित केल्याचं सांगत ओमराजे निंबाळकर यांनी या प्रचारात सामान्य लोकांना आपल्या भोवती ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यात सोशल मीडियाचा प्रभावी वापरही ओमराजेंकडून करण्यात आला, याउलट अर्चना पाटील यांच्याकडूनही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न झाला, मात्र जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावरून ही निवडणूक लढवली गेली नाही, असा सूर आता मतदारांकडून ऐकायला मिळतोय.

advertisement

मराठा आरक्षण मुद्दा महत्वाचा

तर भाजप आमदार राणा पाटील यांनी जरांगे पाटील यांच्यावर केलेली टीका या निवडणुकीत महत्त्वाची ठरली. काही ठिकाणी मराठा समाजाकडून राणा पाटील यांना जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा आणि देवेंद्र फडणीस यांच्या केलेल्या समर्थनाचा रोष पत्करावा लागला होता.

अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, तानाजी सावंत, धनंजय मुंडे, रामदास आठवले यासारख्या दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडल्या, तर ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, अमित देशमुख या नेत्यांनी सभा घेतल्या.

धाराशिव लोकसभासाठी एकूण 63.88 % मतदान झालं असल्याची अंतीम आकडेवारी समोर आली आहे. 19 लाख 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लाख 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यात 6 लाख 90 हजार 533 पुरुष मतदार आणि 5 लाख 82 हजार 416 महिला, 20 तृतीयपंथी मतदार यांनी मतदान केले. पुरुष मतदार टक्केवारी 65.53 तर महिला मतदार टक्केवारी 61.91 इतकी राहिली. तुळजापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 2 लाख 45 हजार 627 मतदान झाले, त्यापाठोपाठ धाराशिव विधानसभा मतदार संघात 2 लाख 34 हजार 106 मतदान झाले, त्यामुळे या 2 मतदार संघाचा कौल महत्वाचा ठरणार आहे. गेल्या वेळच्या तुलनेत 68 हजार 137 इतके मतदान जास्त झाले त्यामुळे तेही महत्वाचे ठरणार आहे.

तालुका निहाय झालेले मतदान

औसा विधानसभा मतदार संघात 2 लाख 94 हजार 086 पैकी 1 लाख 89 हजार 515 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उमरगा विधानसभा मतदार संघात 3 लाख 10 हजार 703 पैकी 1 लाख 87 हजार 351 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तुळजापूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 75 हजार 562 पैकी 2 लाख 45 हजार 627 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात 3 लाख 65 हजार 951 पैकी 2 लाख 34 हजार 106 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंडा विधानसभा मतदार संघात 3 लाख 25 हजार 165 पैकी 2 लाख 6 हजार 616 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बार्शी विधानसभा मतदार संघात 3 लाख 21 हजार 270 पैकी 2 लाख 9 हजार 754 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

2019 च्या निवडणुकीत 18 लाख 86 हजार 238 पैकी 12 लाख 4 हजार 832 इतके 63.87 टक्के मतदान झाले त्यात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 5 लाख 96 हजार 640 तर राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना 4 लाख 69 हजार 74 इतके मतदान मिळाले होते, ओमराजे हे 1 लाख 27 हजार 566 मतांनी विजयी झाले होते.

गेल्या दोन लोकसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवती फिरत होत्या. गेल्या वेळेचा प्रचार देखील केंद्रीय मुद्द्याला घेऊन होता. यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघात मात्र स्थानिक मुद्द्याला घेऊनच आरोप प्रत्यारोप आणि प्रचार झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत कधी नव्हे एवढं ग्रामपंचायत पातळीपासून लढतीला महत्त्व प्राप्त झालं, त्यात वैयक्तिक प्रचारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. ओमराजे निंबाळकरांचा असलेला जनसंपर्क आणि त्यांनी त्यात केलेला प्रचार, तसंच अर्चना पाटील यांनी दिलेली आश्वासन त्यांचाही असलेला संपर्क या दोन गोष्टीचा विचार करता मतदार राजाने आपलं मत मतपेटीमध्ये बंद केलं. आता धाराशिवच्या मतदाराचा कौल मशालीला की घड्याळाला हे मात्र 4 जून नंतरच कळणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv Loksabha : धाराशिवमध्ये हवा दिराची की भावजयीची? कमी झालेल्या टक्क्याने दोघांना टेन्शन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल