बुलढाणा : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला नसतानाच मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. बुलढाणा मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाने नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, पण आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रावसाहेब पाटीलही उद्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना बुलढाण्यामध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे.
advertisement
महायुतीकडून प्रतापराव जाधव यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनीही लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करत एकप्रकारे बंडखोरी केल होती. आता महाविकासआघाडीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची घोषणा झालेली असताना आता महाविकासआघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तुतारी चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय असलेले रावसाहेब पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामुळे महाविकासआघाडीत आणखी वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.
महाविकासआघाडीमध्ये वाद
महाविकासआघाडीमध्ये मुंबईतील दोन तसंच सांगली आणि भिवंडी मतदारसंघावरून वाद सुरू आहेत. काँग्रेसचा मुंबईतील दोन आणि सांगली मतदारसंघावर दावा आहे, पण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने या तीनही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला भिवंडीची जागा हवी आहे, पण ही जागा द्यायला काँग्रेस तयार नाही.
