चिकलठाणा भागात राहणाऱ्या 26 वर्षीय भारतीने (नाव बदलले आहे) या प्रकरणाची तक्रार पोलिसांना दिली आहे. ती 2019 मध्ये पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी टीव्ही सेंटर येथील गोकुळच्या ग्राउंडवर सरावाकरिता जात असताना तेथे तिची ओळख पैठण तालुक्यातील 29 वर्षीय सुमितसोबत (नाव बदलले आहे) ओळख झाली. दोघांची वारंवार भेट होऊन एकमेकांसोबत बोलायला लागले. ओळख अधिक वाढून मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर सुमितने तिला 2023 मध्ये लग्नाची मागणी घातली.
advertisement
मात्र सुमित ऑगस्ट 2023 मध्ये धुळ्यात एस.आर.पी. एफ. मध्ये भरती झाल्याने तो धुळे येथे नोकरीसाठी गेला. तो ट्रेनिंगवरून परतल्यावर 2 मार्च 2025 रोजी भारती आणि सुमितने पुण्याच्या आळंदीत लग्न केले. सुमितची नोकरी धुळ्यात लागल्याने दोघे तिथे राहू लागले. लग्नानंतर चांगला संसार सुरू झाला. मात्र सुमितची गोंदिया येथे बंदोबस्त कामी तीन महिन्यांसाठी ड्युटी लागली, तेव्हा तो एका दुसऱ्या मुलीशी बोलायला लागला. ही बाब भारतीला कळल्यानंतर तिला धक्काच बसला.
7 जुलै 2025 रोजी सुमित घरी आला. तेव्हा तिच्यासोबत चांगले वागत नव्हता. तुला स्वयंपाक येत नाही, काळीच दिसते, तुला काहीच काम येत नाही, असे बोलून वारंवार टॉर्चर करू लागला. शिवीगाळ करून तिला मारहाण करू लागला. नंतर नांदवण्यास नकार देऊन घराबाहेर काढून दिले. त्यानंतर 4 जानेवारीला सकाळी 10 ला भरतीने त्याला कॉल करून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्याने नांदवण्यास नकार देऊन भारती व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भारतीने सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून सुमितविरुद्ध तक्रार दिली.पोलिसांनी एसआरपीएफ शिपायाविरुद्ध गुरुवारी (9 जानेवारी) रोजी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अंमलदार रणजितसिंह चव्हाण करत आहेत.
