विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे जेवणासाठीदेखील बडदास्त ठेवली जाणार आहे.
नागपूरचे वातावरण थंड असले तरी दुसरीकडे नागपुरात येणाऱ्या पाहुण्यांच्या सरबराईसाठी, खवय्यांच्या सेवेसाठी आमदार निवासातील कँटीन रविवारी ७ डिसेंबरपासून सज्ज झाले आहे. थंड हवामानात उबदार पाहुणचार देण्यासाठी ७ डिसेंबरपासून कँटीन पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून दररोज तब्बल तीन हजारांहून अधिक लोकांची भूक भागवण्याची मोठी जबाबदारी येथे पार पडत आहे. आमदार, त्यांचे पीए, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तैनात पोलिस, अशा विविध स्तरातील पाहुण्यांसाठी कँटीनची धावपळ दिवसाआधीच वाढली आहे.
advertisement
आमदार, त्यांचे पीए, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंदोबस्तातील पोलिस अशा दररोज तब्बल ३ हजारांहून अधिक लोकांची भूक भागवणाऱ्या या आमदार निवासाच्या कँटीनमध्ये या वर्षीही खाद्य पदार्थांची रेलचेल दिसून येत आहे. या कँटीनमध्ये रोज लागणारा साहित्याचा आकडा चकित करणारा आहे.
शाकाहारी-मांसाहारी जेवणाची रेलचेल...
कँटीनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे मेन्यू उपलब्ध असून सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत विविध पदार्थांची रेलचेल आहे. शाकाहारी मेजवानीत रोज वांग्याचे भरीत, पालक पनीर, लसूण मेथी, मिक्स व्हेज, झुणका, डाळ तडका, पोळी-भाकरी आणि सॅलड असा ‘फुल ऑन’ मेन्यू उपलब्ध असेल. तर नाश्त्यात दक्षिण भारतीय पदार्थ इडली, डोसा, उत्तपम, उपमा, बटाटा-पोहा, चना-रसा तसेच ऑम्लेट-ब्रेड अशा स्वादिष्ट पदार्थांनी सकाळ ते संध्याकाळपर्यंत भूक भागवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशना निमित्त कँटीनमध्ये स्वयंपाक, सर्व्हिस, स्वच्छता आणि एकूण व्यवस्थापन अशा सर्व कामांसाठी सुमारे ४०० कर्मचारी सज्ज आहेत.
