विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आज महायुती सरकारचा जवळपास 13 दिवसांनी शाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, महायुतीचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शपथविधीमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी पार पाडावा अशीदेखील काही आमदारांची इच्छा आहे.
मंत्रिमंडळावर सस्पेन्स कायम...
advertisement
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सहभागी होणार की नाही? याबाबत अद्याप संभ्रम आहे. गेल्या 24 तासात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी तीनदा वर्षा बंगल्यावर गेले. रात्री दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागण्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. यावर देवेंद्र फडणवीसांनी आपण वरिष्ठांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. मंत्री पदावरुन महायुतीत अजून ही खलबतं सुरू आहेत.गृह, अर्थ या व्यतिरिक्त काही महत्वाच्या खात्यांवरुन अजून ही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गृह खाते मिळणार असेल तर आपण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ, असे शिंदे यांनी म्हटले असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी देखील एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात असावे अशी मागणी केली आहे. आमचा आग्रह एकनाथ शिंदे मान्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. सामंत यांच्या या वक्तव्याने एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहभागावर प्रश्नच निर्माण झाले.
