भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. शपथविधीसाठी अवघे 48 तास शिल्लक असताना आता हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजप आमदारांची विधिमंडळ नेता निवडण्यासाठी 4 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. महायुतीत मंत्रिपदांचे व खात्यांचे वाटप याबाबतचा तिढा कायम असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री ठाण्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले.
advertisement
गिरीश महाजन यांनी काय सांगितले?
ठाण्यात माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नाही. त्यांची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो. तीन चार दिवसांपासून मी वेळ मागत होतो ते गावी निघून गेल्यामुळे माझा त्यांचा संपर्क झाला नाही. युतीमध्ये सगळं अलबेल असून आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत असेही त्यांनी म्हटले.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृह खात्यासह इतर काही महत्त्वाच्या खात्याची मागणी केली आहे. मात्र, भाजप गृहखात्यावरील दावा सोडण्यास तयार नाही. भाजपकडून शिवसेनेला नगरविकास आणि इतर काही खाती देण्याचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्रीपद नसेल तर गृह खातं देण्याची आग्रही मागणी शिंदे यांनी केली असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरुन सत्ता वाटपाचा तिढा सुरू आहे.
सत्ता वाटपाचा तिढा कायम
मागील आठवड्यातील गुरुवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली होती. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सरकार स्थापनेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. एकनाथ शिंदे यांनी आपला प्रस्ताव अमित शाह यांच्यासमोर सादर केला होता.
दिल्लीतील बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या गावी गेले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी आपली प्रकृती बरी नव्हती सांगत सत्ता वाटपाचा तिढा सुटणार असल्याचे जाहीर केले होते.
