एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्याशिवाय, शिंदे गटाचे खासदार अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याचे काही तास आधी जाहीर केले. त्यानंतर शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच्या काही मिनिटे आधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपची पत्रकार परिषद असल्याचे जाहीर केले. तर, दुसरीकडे तात्काळ दिल्लीतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शिवसेना शिंदे खासदार भेट घेणार असल्याची माहिती समोर आली.
advertisement
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यानंतरही महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही. महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण, यावर तिढा सुरू झाला. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीमध्ये वेगवेगळे दावे होऊ लागल्याने हा तिढा वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी दिल्लीत अंतिम निर्णय होईल असा सूर आळवला आहे.
