सत्ता वाटपाचा तिढा कायम
मागील आठवड्यातील गुरुवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली होती. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सरकार स्थापनेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. एकनाथ शिंदे यांनी आपला प्रस्ताव अमित शाह यांच्यासमोर सादर केला होता.
advertisement
दिल्लीतील बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या गावी गेले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी आपली प्रकृती बरी नव्हती सांगत सत्ता वाटपाचा तिढा सुटणार असल्याचे जाहीर केले.
महायुतीचे तीन नेते, तीन दिशांना..
सत्ता वाटपावर तिढा काढण्यासाठी महायुतीची आज बैठक होणे अपेक्षित होते. मात्र, महायुतीचे तिन्ही नेते आज भेटणार नसल्याची दाट शक्यता आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव आजच्या सगळ्या बैठका रद्द केल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एकनाथ शिंदे हे सध्या घरीच विश्रांती घेत आहेत.
तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे दुपारी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. अजित पवार हे दिल्लीत नेमकी कोणाची भेटगाठ घेणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
भाजपचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असणारे देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील सागर बंगल्यावर आहेत. फडणवीस यांच्या भाजप नेत्यांसोबत खलबतं सुरू आहेत. त्याशिवाय, काही नवनिर्वाचित आमदारही त्यांची भेट घेत आहेत. भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट असलं तरी मंत्रिपदाच्या वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये पेच असल्याची चर्चा आहे. शिवसेना गृह खात्यासाठी आग्रही आहे.
