आमदार म्हणून निवडून आल्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्यांदाच आपला आज जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जनता दरबारानंतर न्यूज 18 लोकमतसोबत बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. बावनकुळे यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे. तर, मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते की त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावे. पण आता तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेतील. लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
सरकार स्थापन करायला वेळ का?
सरकार स्थापन करण्यास वेळ लागत असल्याच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी म्हटले की, तीन पक्षांचे सरकार बनवताना थोडा वेळ लागतो. मंत्रीपद कसे वाटायचे, कोणाला कोणते खाते द्यायचे, पालकमंत्री कुठे कोण असेल हे सर्व सूत्र तयार करून सरकार तयार होत असते. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव निश्चित करणे एवढेच नसते. त्यामुळे काही काळ जाईल आणि लवकरच सरकार स्थापन होईल असेही त्यांनी सांगितले. नव्या सरकारचा शपथविधी नोव्हेंबर मध्ये होईल की डिसेंबरमध्ये होईल, हे इतक्यात सांगता येणार नसून सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचा मुख्यमंत्री?
भाजपचा मुख्यमंत्री होणार का, यावर बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, मला याबद्दल फारशी माहिती नाही. याबद्दलचा सर्व निर्णय आमचे केंद्रीय नेतृत्व आणि तीन पक्षाचे नेते बैठकीत घेतील.मी संघटनेचे काम पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपसोबत बेईमानी केली, तेव्हा त्यांना सरकार बनवण्यासाठी दीड महिना लागला होता. आमचं सरकार योग्य पद्धतीने बनत आहे. त्यामुळे आमची काळजी करण्याची गरज नसल्याचे प्रत्युत्तर विरोधकांना दिले.
