विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपआपल्या विधीमंडळ गटनेत्याची निवड करण्यात आली. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आणि अजित पवार हे राष्ट्र्वादीचे गटनेते असणार आहेत. परंतु, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने अद्यापही आपला गटनेता निवडला नाही. भाजपचा गटनेता हाच मुख्यमंत्री असणार असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत गटनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
advertisement
भाजपच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक कधी?
विधिमंडळातील भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना आज रात्री बैठकीसाठी फोन जाण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे सर्व आमदार हे उद्यापर्यंत मुंबईमध्ये दाखल होतील. त्यानंतर भाजपाचे निरीक्षक मुंबईत येणार आहेत. भाजपा निरीक्षक सर्व आमदारांसोबत गटनेता निवडीबाबत संवाद असतील. या बैठकीमध्ये गटनेता आणि प्रतोद दोन प्रस्ताव मांडले जातील. या दोन पदासाठी नावे प्रस्तावित होतील. विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची निवड होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. हा शपथविधी आटोपल्यानंतर सगळे आमदार हे आपल्या मतदारसंघात परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेना आमदारांची तातडीची बैठक
राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील राज्यात नवीन सरकारने कारभार हाती घेतला नाही. तर, दुसरीकडे सत्ता स्थापनेचा दावाही करण्यात आला नाही. त्यामुळे नेमकं काय घडतंय, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलवली आहे. ही महत्वाची बैठक आज दुपारी वर्षा किंवा नंदनवनला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
