अमित शाह यांच्याकडे शिंदेंची मागणी...
गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असल्याचे समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती. सरकारच्या पूर्णकाळासाठी हे मुख्यमंत्रीपद देणे शक्य नसेल तर शिंदे यांनी त्याला पर्याय दिला. सरकारच्या कार्यकाळातील सुरुवातीचे किमान 6 महिने तरी मुख्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी केली. त्यावर अमित शाह यांनी नकार देत मागणी फेटाळून लावली.
advertisement
शिंदेंची मागणी फेटाळली...
एकनाथ शिंदे यांची मागणी फेटाळून लावताना भाजप नेतृत्त्वाने ही मागणी चुकीची असल्याचे सांगितले. फक्त 6 महिन्यांसाठी मुख्यमंत्रीपद देणे हे चुकीचे उदाहरण ठरू शकेल आणि 6 महिन्यासाठी मुख्यमंत्रीपद देणे, अशी कोणतीही पद्धत नसल्याचे भाजपने स्पष्ट केले. इतक्या कमी कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद दिल्यास त्याचा परिणाम प्रशासनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता भाजप नेतृत्वाने व्यक्त केली.
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून सुरू होते वक्तव्य
महायुती सरकारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आपला कोणताही अडथळा होणार नाही. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचा निर्णय हा अंतिम राहिल असे काळाजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी ही बैठक झाली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळवला. शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागांवर विजय मिळवला. विधानसभा निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य करण्यात येत होते.
