मागील काही दिवसांपासून सरकार स्थापनेबाबतच्या हालचाली मंदावल्या होत्या. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस साताऱ्यातील आपल्या गावी गेले होते. त्यामुळे महायुतीत कोणतीही चर्चा झाली नाही. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपआपले विधीमंडळ गटनेते निवडले. मात्र, भाजपकडून अद्याप गटनेता निवडण्यात आला नाही. येत्या एक-दोन दिवसात ही प्रक्रिया पार पडणार आहे.
advertisement
महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी...
मागील आठवड्यातील गुरुवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली होती. त्यानंतर भाजप आणि महायुतीची बैठक होणे अपेक्षित होते. या बैठका देखील झाल्या नाहीत. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सरकार स्थापनेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. एकनाथ शिंदे यांनी आपला प्रस्ताव अमित शाह यांच्यासमोर सादर केला होता.
महायुतीचे नेते कधी जाणार दिल्लीला?
महायुती सरकार स्थापनेत खातेवाटप हा कळीचा मुद्दा ठरला असल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीत महाराष्ट्राच्या खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पुन्हा बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे म्हटले जात आहे. महायुतीच्या नेत्यांचा कोणत्याही क्षणी दिल्ली दौरा होण्याची शक्यता आहे.
