महायुतीमधील सत्ता वाटपाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीने मंगळवारी सायंकाळनंतर मोठ्या घडामोडी घडल्या. काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप विधीमंडळ पक्षाची आज बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत गट नेत्याची निवड झाल्यानंतर महायुतीकडून तातडीने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. महायुतीचे नेते दुपारीच राज्यपालांची भेट घेणार आहेत.
advertisement
शिंदे-फडणवीसांमध्ये 6 दिवसांनी भेट...
निवडणूक निकालानंतर 6 दिवसानंतर काळजीवाहू मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. 'वर्षा' बंगल्यावर बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटं बैठक झाली. खाते वाटपासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गृह खात्यावरील दावा सोडला?
या बैठकीनंतर शिवसेनेने गृह खात्यावरील आपला दावा सोडला असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांना गृह ऐवजी नगरविकास आणि आणखी एखादे महत्वपूर्ण खाते दिलं जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत 20 हून अधिक मंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी दिली.
