काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुरू असताना बुधवारी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत दिल्लीत होणारा निर्णय मान्य असेल असे वक्तव्य केले. आपण पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्रीपदाबाबतच्या निर्णयात आपला कोणताही अडसर राहणार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपली दावेदारी मागे घेतली असल्याची चर्चा सुरू झाली.त्यानंतर आता एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी शिंदे गटाच्या आमदारांनी एकत्रित होण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
कोणते आमदार झाले दाखल?
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी प्रकाश सुर्वे , शंभूराज देसाई, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील आदी नवनिर्वाचित आमदार दाखल झाले आहेत. महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात यातील काही आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिंदे यांच्या निवासस्थानावर त्यांच्या दौऱ्या आधी होणारी बैठक अतिशय महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत आज होणार निर्णय?
राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस मतदान झाले. महायुतीच्या पारड्यात 234 जागा आल्या. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत तिढा सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दिल्लीत आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होणार आहे.
