राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. मागील आठवड्यातील गुरुवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली होतीा. त्यानंतर भाजप आणि महायुतीची बैठक होणे अपेक्षित होते. या बैठकादेखील झाल्या नाहीत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेतील गोंधळ आणखीच वाढला आहे.
advertisement
आणखी एक तारीख...
शिवसेनेसोबतची सत्ता वाटपाची बोलणी पूर्ण होत नसल्याने भाजपची गटनेता निवडही पुन्हा लांबणीवर पडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप गटनेता निवडीसाठीची बैठक आता लांबणीवर पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजप आमदारांची गटनेता निवडीची बैठक 2 डिसेंबर रोजी होणार होती. मात्र, ही बैठक आता 3 डिसेंबर रोजी होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, भाजपकडून गटनेत्याची निवड झाली नाही. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपला विधीमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी कधी?
राज्यातील नवनिर्वाचित 288 आमदारांचा शपथविधी मुंबईतील विधानभवनातच पार पडणार आहे. विधानसभेत 8 आणि 9 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूरचे हिवाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणेच 16 ते 24 डिसेंबर या काळात पार पडणार आहे.
