जळगावच्या धरणगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या मातोश्री तथा ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार रुखमाबाई रतन वाघ यांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण महिला सर्वसाधारण गटासाठी निघाले. रुखमाबाई वाघ या ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार होत्या. आता त्यांचे नाव गायब झाल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला नवीन उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
advertisement
शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांनी हा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप केला. आपल्या राजकीय विरोधकांनी कटकारस्थान रचून त्यांच्या आईसह बहिणीचे नाव मतदार यादीतून वगळले. निवडणूक एकतर्फी व्हावी यासाठी विरोधकांनी तब्बल १० ते १२ लाख रुपयांचा खर्च करून हे कटकारस्थान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल...
या संदर्भात ठाकरे गटाने धरणगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्याने गटाने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय, नगरपालिकेच्या मतदार यादीत प्रचंड घोळ असून अनेक प्रभागांमध्ये दुबार नावे, चुकीचे फोटो आणि मतदारांचे वार्ड बदलल्याचे प्रकार आढळत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे. या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.
