नगरपालिका निवडणूक मतदान सुरू असतानाच बुलढाणा शहरात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात बनावट मतदार आणल्याचे आरोप आधीच सुरू असताना, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच दोन बोगस मतदारांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. ग्रामीण भागातून बोगस मतदारांंना शहरात आणण्यासाठी वाहनांचा वापर करण्यात आला. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.
advertisement
आज सकाळी प्रभाग क्रमांक १५ मधील गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर बोगस मतदार आढळून आला. मतदारांच्या पडताळणीदरम्यान कोथळी (तालुका मोताळा) येथील एका व्यक्तीने वैभव देशमुख या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले. त्याच्या ओळखपत्रातील तपशील संशयास्पद वाटल्याने चौकशी करण्यात आली आणि बोगस मतदार असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्तीही असल्याचे दिसून आल्यानंतर दोघांनाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
या घटनेमुळे बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत बोगस मतदानाचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मतदार आणल्याचे आरोप आधीच केले होते, मात्र कोणत्या पक्षाकडून हे मतदार आणले गेले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मतदानाच्या सुरुवातीच्या तासातच बोगस मतदार पकडले गेल्याने निवडणूक आयोगाची भूमिका, सुरक्षा तपासणी आणि राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपावर नवीन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून, मतदारांच्या याद्यांमध्ये फेरफार झाला का याचाही तपास केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात या प्रकरणामुळे तणावाचं वातावरण असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचा गंभीर आरोप...
बुलढाण्यातली बोगस मतदार प्रकरणी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेसने केला. घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेस, पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
