रविवारी (15 जून) दिवसभर नागपूरमध्ये भाजप नेते आणि संघाच्या विविध अनुषांगिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक तयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदारही या बैठकीला उपस्थित होते.
advertisement
भाजपने मांडला निवडणुकीचा रोडमॅप...
या बैठकीदरम्यान भाजपने संघ पदाधिकाऱ्यांसमोर आपला निवडणुकीचा रोडमॅप मांडला. आगामी निवडणुकांमध्ये अधिकाधिक मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत नेण्याचा निर्धार करण्यात आला असून, मतदारांशी थेट संवाद साधून सरकारच्या योजनांची माहिती देण्याचे नियोजन आहे.
संघाची होणार भाजपला मदत...
संघाच्या माध्यमातून भाजपला बुथ स्तरावर संघटनशक्ती मिळणार आहे. यामुळे पक्षाचे नेटवर्क अधिक बळकट होईल, असा भाजपचा विश्वास आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये सरकारच्या योजनांचा प्रसार करून भाजपचा पाठिंबा वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विधानसभा निवडणुकीनंतर होत आहेत. त्यामुळे विरोधकांना वरचढ होऊ देण्याची कोणतीही संधी न देण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यामुळेच या बैठकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजप आणि संघाच्या या नव्या समन्वयातून राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीतही मोठा बदल झाल्याचे दिसून आले. भाजपला चांगले यश मिळाले होते.