बुलडाणा जिल्ह्यातील महायुतीत जागावाटपावरून पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. चिखलीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चिखली नगरपालिकेचे महापौरपद शिवसेनेला देण्याची मागणी केली असून, त्याबदल्यात बुलढाणा महापालिकेचे महापौरपद भाजपने घ्यावे, असा प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे. मात्र भाजपने ही ऑफर स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे.
चिखलीत पूर्वी महापौर पद भाजपकडे होते. त्यामुळे "आम्ही असलेली जागा सोडणार नाही," अशी भूमिका भाजपने घेतली. भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सांगितले, “सिटिंग-गेटिंग हा महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. चिखलीत महापौर आमचाच होता, त्यामुळे ती जागा मागण्याचा अधिकार शिवसेनेला नाही. बुलढाणा कोणाला सोडायचे, यावर चर्चा होऊ शकते.”
advertisement
आमदार संजय गायकवाड यांनी महायुतीत असमानतेचा आरोप करत भाजपला सुनावले. “महायुती करायची असेल, तर जागा सन्मानाने सोडाव्या लागतील. तुम्ही म्हणाल तसे चालणार नाही,” असे ते म्हणाले. तसेच, चिखली सोडा, त्याबदल्यात बुलढाणा तुम्हाला देऊ, अशी डील त्यांनी सुचवली.
मात्र यावर विजयराज शिंदे यांनी पलटवार केला. “बुलढाण्याची ऑफर देण्याचा अधिकार गायकवाडांना कोणी दिला? आतापर्यंत येथे 25 वर्षांत महापौर भाजप किंवा शिवसेनेचा झालेला नाही. निवडणुकीनंतर ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त, त्यांचा महापौर होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. महायुती एकदिलाने स्थानिक निवडणुका लढणार असल्याचे दावे केले जात असताना, जागावाटपाचा प्रश्न पुन्हा महत्त्वाचा ठरत आहे.
