संभाजीनगरमधील हॉटेल खरेदी प्रकरण मागे पडत नाही तोच त्यांचा पैशांनी भरलेल्या बॅगचा कथित व्हिडिओ समोर आला आणि मोठी खळबळ उडाली. अधिवेशन काळामध्ये शिरसाट यांच्यावर झालेल्या आरोपामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मोठी अडचण झाली होती. शिरसाट यांच्यावरील आरोपांनी पक्षाची कोंडी झाली होती.
...अशावेळी आपण देवाला शरण गेले पाहिजे
त्यामुळे अधिवेशन संपताच संजय शिरसाट यांनी शनिचरणी नतमस्तक होऊन आपल्यावर आलेल्या संकटाची मालिका दूर व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. आपल्याकडून काही चुका होतात किंवा घडतात अशावेळी आपण देवाला शरण गेले पाहिजे, असे शिरसाट दर्शनानंतर म्हणाले.
advertisement
चौथाऱ्यावर जाऊन शनिदेवाला तैलाभिषेक
संभाजीनगर हॉटेल खरेदी प्रकरण, पैशांनी भरलेल्या बॅगचा कथित व्हिडीओ, तसेच आयकर विभागाने दिलेल्या नोटिसीमुळे शिरसाट यांचे मंत्रिपद जाते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी सहकुटुंब शनि शिंगणापूर येथे जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी विजया, मुलगा सिद्धांत, मुलगी हर्षदा होते. उदासी महाराज मठात अभिषेक केल्यानंतर शिरसाट कुटुंबीयांनी चौथाऱ्यावर जाऊन शनिदेवाला तैलाभिषेक केला.
आपल्यावर संकटांची मालिका सुरू आहे. माझ्यावर आलेली सगळी संकटे दूर व्हावीत, ती टळावीत, यासाठी आपण देवाकडे आलो आहोत. देवदर्शनातून मानवाला समाधान मिळते. म्हणूनच सहकुटुंब मी शनि दर्शनाला आलो आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.